सुभेदार वाडा शाळेची वास्तू-स्थित्यंतरे
ऐतिहासिक कल्याण शहरात येणाऱ्या मराठी माणसाला शहरात आल्यानंतर सुभेदार वाड्याची आठवण येते. कल्याण - सुभेदार वाडा हे जणू समीकरणच झाले आहे. असा हा ऐतिहासिक वाडा १७६६ ते १७६९ या कालावधीत बांधला गेला. वसईच्या मोहिमेत कर्तृत्व दाखवलेले रामाजी महादेव बिवलकर यांची नानासाहेब पेशव्यांनी १७६० साली कल्याण सुभ्यावर सुभेदार म्हणून नेमणूक केली. त्यांचे वास्तव ठाणे येथे असे, कारभाराच्या निमित्ताने त्यांचा वावर कल्याणला असे. कल्याण येथे त्यांची कचेरी होती. कारभारासाठी कल्याण येथे कचेरी आवश्यक होती. त्यासाठी १७६६ मध्ये कचेरीसाठी बांधकामास सुरुवात झाली व १७६९ साली बांधकाम पूर्ण झाले. बांधकाम पूर्ण झालेली वास्तू पुढे 'सुभेदार वाडा' या नावाने परिचित झाली. सुमारे ४ फूट उंचीच्या दगडी जोत्यावर २ मजली इमारत बांधली गेली. दर्शनी भागात एकूण ९ खांब होते. अंबारीसह हत्ती प्रवेश करू शकेल असा १२ फूट उंच व ७.५ फूट रुंद भव्य दिडी दरवाजा दर्शनी भागात होता. (आजही हा दिंडी दरवाजा शाळेत जतन करून ठेवला आहे.) दिंडी दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूस दोन लाकडी जिने होते. दिडीच्या वर ६८x२८ चौ. फूटाचा भव्य गणेश महाल होता. कातीव खांब, भव्य महिरपी, रस्त्याच्या बाजूला जमिनीलगत ९ खिडक्या, सागवानी लाकडाच्या फळ्यांचे फॉल सिलिंग अशा प्रकारे हा | महाल सुशोभित केलेला होता. (नवीन वास्तूत यातील काही महिरपीचा वापर बापट सभागृहात केलेला आहे.) वाड्याच्या मधोमध ३३ ×३३ चौ. फूट चौकोनी आकाराचा चौक चौकाच्या चारी बाजूस सोपे, समोर गणपती बसतो ती ओटी, ओटीच्या डाव्या-उजव्या बाजूस स्वयंपाकघर, माजघर आणि एकंदरीत सहा खोल्या अशी व्यवस्था होती. पुढील ओटी व माजघर यांच्या मधोमध डाव्या बाजूस वर जाण्यासाठी एक जिना होता. जिना चढून वर गेल्यावर गणेश महाल व गणेश महालाच्या समोरील दोन्ही बाजूस बैठकीच्या विश्रांतीच्या खोल्या असे याचे स्वरूप होते. बऱ्याचशी भिंती ३ ते ३.५ फूट रुंदीच्या होत्या. साधारणत: १८२० सालच्या आसपास बिवलकर मंडळी या वाड्यात वास्तव्यास होती.
कै. गोपाळ नारायण अक्षीकर यांनी २ जानेवारी १८९० रोजी हायस्कूल कल्याणची स्थापना केली. सुरुवातीस वाड्यातल्या खोल्यांतच वर्ग भरत असत. या शाळेची पुढे भरभराट होऊ लागली. दरवर्षी विद्यार्थीसंख्या वाढत गेली. पहिल्या वर्षातच विद्यार्थीसंख्या ९६ वर पोहोचली. १९२१ साली विद्यार्थी संख्या १८७ झाली. १९२४ साली इयत्ता सहावी व १९२५ साली इयत्ता सातवी या टप्याने शाळेची भरभराट झाली. हे सर्व वर्ग वाड्याच्या खोल्यांमध्ये भरत असत. विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे प्रशस्त जागेची गरज भासू लागली. संस्थेने शाळेकरिता वाडा विकत घेतल्याने शाळेच्या दृष्टिने वाड्याच्या बांधकामामध्ये बरेच बदल करावे लागले.
तळमजल्यावर चौकाच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी तीन व समोर माजघराच्या जागी एक वर्ग व पुढे ओटी असे एकूण सात वर्ग तयार करण्यात आले. दिंडीच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी एक असे दोन याप्रमाणे तळमजल्यावर नऊ वर्गखोल्या तयार झाल्या.
जिना चढून वर गेल्यावर तळमजल्याप्रमाणे पहिल्या मजल्यावर डाव्या व उजव्या बाजूस प्रत्येकी तीन व समोरील बाजूस दोन असे एकूण आठ वर्ग तयार करण्यात आले व चारही बाजूनी गॅलरी व लोखंडी दोर जोडण्यात आले. गणेश महालाचे विभाजन करून त्यामध्ये मुख्याध्यापक, लेखनिक यांचे कार्यालय य आवश्यक्तेनुसार शिक्षक कक्ष, प्रयोगशाळा इ. ची व्यवस्था असे स्वरुप देण्यात आले.
कै. श्री. कृष्णाजी यशवंत घारपुरे यांनी वीस हजार रु. देणगी दिली त्यामुळे १९८४ सालच्या सुमारास शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर ६६×४८ आकाराचे सभागृह तयार करण्यात आले. या सभागृहात ३०० ते ३५० विद्यार्थी एकाच वेळी बसू शकत असल्याने येथे अनेक कार्यक्रम होऊ लागले.
४ ऑक्टोबर १९८४ रोजी याच वास्तूत पूर्व प्राथमिक शाळा सुरु करण्यात आली. या पूर्व प्राथमिकचा वर्ग सुरूवातीस सुभेदार वाड्याच्या ओटीवरील मागच्या बाजूस असलेल्या वर्गात भरू लागला नंतर प्राथमिक व पूर्व प्राथमिकचे वर्ग ओटीवरील तीन वर्ग व मागील एक वर्ग यांच्यात भरू लागले. १९८५ च्या जूनमध्ये पहिली व पूर्व प्राथमिकचे वर्ग सुरु झाल्याने हायस्कूलसाठी जागेची कमतरता भासू लागली. १९४१ साली न्यू हायस्कूल कल्याणची इमारत बांधून पूर्ण झाली त्यानंतर संस्थेने कोणताच इमारतीचा प्रकल्प हाती घेतला नव्हता. या पार्श्वभूमीवर नवीन इमारतीचा प्रस्ताव पुढे आला. मा. क. प्रभुदेसाई, कै हो ना. मुकुंदराव दामले, कै. माधवराव साखरदांडे, के बा. ग. चितळे, कै. सु. ग. केळकर, श्री. सी. एम. पुराणिक य एकत्र येऊन नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव समोर आणला. वाड्याच्या मागील बाजूस इमारत बांधावी, असे दर आर्किटेक्ट श्री. रत्नाकर पुराणिक यांना इमारतीचा आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले. श्री. कृष्णा कौलापुरे यांना बांधकामाचा ठेका देण्यात आला. दि. २२-१०-१५ रोजी विजयादशमीच्या सुमुहूर्तावर नवीन इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. क. र. प्रभुदेसाई यांच्या करण्यात आला. पहिल्या टप्यात ८ वर्गखोल्या बांधण्यात आल्या. त्याचा खर्च रु. १४,७०,०००/- एवढा झाला. या इमारती शेजारीच दुसरी ४ मजली इमारत उभी करण्यात आली व मैदानावरील मोकळ्या जागेत २ मजली इमारत बांधून त्यामध्ये शिक्षककक्ष, मुख्याध्यापकांचे कार्यालय याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली. ४ मजली इमारतीचे बांधकाम करताना पाया २८ फूट खोल, यामुळे त्या इमारतीच्या तळाशी बेसमेंट तयार करण्यात आले. बेसमेंट, १६ वर्गखोल्या व प्रशासकीय इमारत यांच्या बांधकामाचा एकूण खर्च रु. ३६,८६,०४०/ एवढा झाला. इमारत बांधकामाच्या कामात अनेक अडचणी आल्या परंतु त्यावेळेचे मुख्याध्यापक श्री. उ. स. माऊसकर यांनी धडाडीने सर्व अडचणींवर मात केली. म्हणूनच या इमारती उभ्या राहिल्या. पुरेसे वर्ग उपलब्ध झाल्यामुळे माध्यमिक विभागाचे स्थलांतर नवीन इमारतीत करण्यात आले व सुभेदारवाड्याच्या जुन्या इमारतीत पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा भरू लागल्या.
इ.स.वी. सन १९९३ ला किल्लारी येथे मोठा भूकंप झाला. हे निमित्त ऐतिहासिक वाड्याच्या पडझडीला कारणीभूत झाले. जुलै २००० मधील अतिवृष्टी व जानेवारी २००१ मधील भूकंपही या पडझडीला कारणीभूत ठरले. जुलै २००१ मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी वाड्यास भेट दिली. वाड्याच्या तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावर अनेक लोखंडी टेकू दिलेले होते. वाडा मोडकळीस आला असून तो धोकादायक आहे. रस्ता रुंदीकरणामध्ये वाड्याच्या पुढील काही फुटापर्यंतचा भाग जाणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाडा पाडावा, असा अभिप्राय त्यांनी दिला. खासदार श्री. राम कापसे, कै. नारायणराव मराठे, ठाणे जिल्ह्याच्या आर्किटेक्ट असोसिएशनचे सदस्य श्री. भगवान फडणीस व त्यांचे सहकारी, नगरसेविका सौ. अलका आवळसकर इत्यादींनी वाड्यास भेट दिली व वाडयाची चाचणी करावी, असे मत व्यक्त केले. माजी विद्यार्थी अँड. श्री. सुरेश पटवर्धन व श्री. मोहन आधारकर यांनीही या कामात सहकार्य केले. या सर्व पार्श्वभूमीवर जून २००१ मध्ये सुभेदारवाडा प्राथमिक शाळा न्यू हायस्कूल, कल्याण येथे स्थलांतरीत करण्यात आली व पूर्व प्राथमिक शाळा आशासदन, राममारुती रोड येथे स्थलांतरित करण्यात आली. यामुळे विद्यार्थी व पालकांची गैरसोय झाली. माजी शिक्षक व कल्याण नागरिकचे संपादक कै. वा. ना. देवधर यांनी कल्याण नागरिकमध्ये संपादकीय प्रसिद्ध करून पालकांना आश्वासित केले व शाळेस मोलाचे सहकार्य केले. कै. देवधर यांनी वाड्याचा दिंडी दरवाजा, गणेश महलाच्या महिरपी जतन कराव्या अशी सूचना केली. त्यानंतर नवीन इमारत बांधण्याचा निर्णय निश्चित झाला. इमारतीच्या बांधकामासाठी श्री. सतीश देशपांडे (कार्याध्यक्ष), श्री. संदीप वैद्य, श्री. ग. र. जोशी, कै. अ. कृ. दीक्षित, श्री. सी. एम्. पुराणिक, श्री. डी. सी. कांबळे, श्री. आर. टी. जोशी, श्रीमती शैलजा मोडक, सौ. माधुरी गाडगीळ यांची समिती तयार करण्यात आली.
बुधवार दि. ४ सप्टेंबर २००१ रोजी नवीन इमारतीचा भूमिपूजन समारंभ गुरूवर्य मुख्याध्यापक कै. र. वि. सोमण यांच्या शुभहस्ते झाला. समारंभाचे अध्यक्षस्थान कै. दि. रा. कुंटे यांनी भूषविले होते. समारंभाचे प्रमुख पाहुणे के. खासदार प्रकाश परांजपे हे होते.
पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी आर्किटेक्ट म्हणून श्री.जयंत सुभेदार यांनी काम पाहिले. बांधकामाचा ठेका श्री. फाटक बंधू, डोंबिवली यांना देण्यात आला. आर. सी. सी. कन्सल्टंट म्हणून श्री. खासनीस यांनी काम पाहिले. इमारतीला आकर्षक स्वरूप देण्यात सौ. साधना वैद्य (आर्किटेक्ट) यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांनीच आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ सहा लाख रूपये देगणी दिली. त्यातून या टप्यातील बांधकामाच्या पहिल्या मजल्यावर बापट सभागृह बांधण्यात आले.
पहिल्या टप्प्यात १२ वर्ग खोल्यांचे बांधकाम झाले. २००१ ते २००४ या कालावधीत २६ वर्गखोल्या बांधून झाल्या. जून २००३ मध्ये न्यू हायस्कूल, कल्याण येथे स्थलांतरित केलेले प्राथमिक शाळेचे वर्ग नवीन इमारतीत भरू लागले. नोव्हे. २००३ पासून पूर्व प्राथमिक शाळेचे वर्ग नवीन इमारतीत भरू लागले. या पहिल्या टप्याच्या बांधकामास सुमारे १ कोटी ५० लाख रूपये खर्च झाला. त्यावेळेच्या नियमाप्रमाणे मंजूर झालेल्या एफ.एस.आय. प्रमाणे एवढेच बांधकाम होऊ शकेल. श्री. सी. एम. पुराणिक यांनी पहिल्या टप्प्याच्या बांधकामाचे प्रोजेक्ट इनचार्ज म्हणून काम पाहिले. पुढील काही काळ बांधकाम झाले नाही. नंतर बांधकामाच्या देखरेखीसाठी संस्थेची नवीन समिती तयार करण्यात आली. आर्किटेक्ट व माजी विद्यार्थी दिलीप दळवी यांची आर्किटेक्टपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कार्पोरेशनच्या पदाधिकान्यांपुढे शाळेची बाजू मांडली व नियमानुसार वाढीव एफ.एस.आय. मंजूर करून घेण्यात आला. इमारत बांधकामाचा ठेका श्री. फाटक बंधू यांना देण्यात आला. माजी विद्यार्थी, आर्किटेक्ट श्री. दिलीप दळवी यांनी व्यावसायिक फी न घेता हे सर्व काम विनामूल्य केले. संस्थेने एक इमारत सर्वाधिकार समिती नेमली. त्या समितीमध्ये श्री. सी. एम. पुराणिक, श्री. शैलेंद्र साळवी, श्री. संदिप वैद्य, श्री. प्रदिप राका, श्री. चौघुले, श्री. कामेरकर, श्री. प्रसाद सरदेसाई, त्यावेळचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. वि. ना. गायकवाड यांचा समावेश होता. १० डिसेंबर २०१० रोजी दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामास वेगाने सुरुवात झाली व सप्टेंबर २०१२ रोजी दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण झाले. पहिल्या टप्यातील इमारतीत ८ वर्गखोल्या व प्रशासकीय इमारत नवीन इमारतीत समाविष्ट केली आहे. टप्प्याच्या बांधकामास सुमारे २ कोटी ९० लाख १० हजार रूपये खर्च आला व सर्व संकुलासाठी ५२ वर्ग, स्टील्ट व तीन मोठे हॉल शाळेकरीता उपलब्ध झाले. प्रवेशद्वाराजवळ प्रशस्त गेट बसविण्यात आले. २०११ मध्ये या सर्व घडामोडींस साक्ष असणाऱ्या पिंपळाच्या झाडाखालील देवासाठी (म्हसोबा ) मैदानात छोटे देऊळ बांधले व त्याचबरोबर देवी सरस्वतीसाठीही देऊळ बांधले. धार्मिक, विधीवत पद्धतीने या देवतांची तिथे प्रतिष्ठापना केली गेली.
नवीन इमारतीत सुंदर वाचनालय, प्रयोगशाळा, कॅन्टिन, कलादालन, संगणक कक्ष, किमान कौशल्याचे वर्ग, इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे वर्ग यांची चांगली सोय झाली. इमारतीच्या स्वच्छतेकडे व इतर चांगल्या व्यवस्थापनाकडे श्री. प्रसाद सरदेसाई यांनी कौतुकास्पद लक्ष दिले. कल्याण शहरात मराठी माध्यमाच्या विद्यार्थासाठी संस्थेने सुंदर इमारत उपलब्ध करून दिली. कल्याण शहरातील नागरिक, माजी विद्यार्थी, आजी व माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही आपला वाटा उचलला व सुमारे १ कोटी १० लाख रू. ह्या प्रकल्पासाठी देणगीरूपाने जमा करून दिले. अद्यापही इमारतीचा काही भाग पूर्ण करायचा आहे. हा प्रकल्प संचालकांनी व शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीने पूर्ण करण्याचा मानस व्यक्त केला असून भविष्यात तो निश्चित पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करतो.