Ready Set Go


श्री. प्रसाद सरदेसाई, संचालक मंडळ सदस्य,ज. ए. इ. दादर

कल्याण या ऐतिहासिक शहरातील पहिली माध्यमिक शाळा म्हणून सुभेदारवाडा या शाळेस मान प्राप्त झाला.अर्थात सन१८९० हे माध्यमिक शाळेचे स्थापना वर्ष .काळाची गरज ओळखून सन १९८४-८५ या वर्षात पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाची स्थापना करण्यात आली.

सुभेदार बिवलकरांनी ही वास्तू नाममात्र किमतीत ज. ए. इ. या संस्थेस बहाल केली. याक्षणी काळाच्या विलक्षण ओघातही शाळेने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक ( कला विभाग , अकाउंटिंग- ऑडिटिंग ,इलेक्ट्रॉनिक्स ) असे विभाग शाळेत बघावयास मिळतात. साधारणतः साडे तीन हजार विद्यार्थी सुभेदारवाडा या वास्तूत अध्ययन करीत आहेत.

मराठी माध्यमाची शाळा व त्यात करण्यात आलेला आमूलाग्र बदल याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थी संख्या टिकून राहण्यावर झालेला आहे.इ. १ ली ते इ ४थी च्या १६ वर्गांपैकी १२ वर्ग हे सेमी इंग्रजी चे आहेत.इ ५ वी ते १० वीच्या ३० वर्गांपैकी २४ वर्ग सेमी इंग्रजीचे आहेत.शिवाय नर्सरी ,छोटा शिशु व मोठा शिशु या वर्गांनादेखील इंग्रजी भाषेची ओळख करून देण्यात येते.थोडक्यात सकाळ व दुपार विभागात पालकांच्या सोयीनुसार वर्गांची आखणी करण्यात आलेली आहे.पूर्व प्राथमिक ते माध्यमिक सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना संस्कृत व फ्रेंच भाषेचे अध्यापन करण्यात येते. त्याचा परिणाम म्हणजे इतर मराठी माध्यमाच्या शाळांच्या तुलनेत आपल्या शाळेने आपला लौकिक टिकवून ठेवला.

विविध स्पर्धा परीक्षा व शाळाबाह्य उपक्रम , स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून करवून घ्यायची तयारी इत्यादी गोष्टींमुळे मोठ्या संख्येने दरवर्षी विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात.

शाळेची प्रशस्त इमारत ,पुरेशी प्रसाधन गृहे ,मुबलक पाण्याची सोय, पटांगण, इ लर्निंग ची सुविधा, सुसज्ज संगणक कक्ष ,कार्यक्रमासाठी एक प्रशस्त सभागृह या आणि अशा अनेक वैशिष्टयांनी शाळा युक्त आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे,शाळेच्या नवीन वास्तूस शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सढळ हस्ते मदत करून हातभार लावला आहे. माध्यमिक शाळेचा शताब्दी महोत्सव , शतकोत्तर रौप्य महोत्सव आणि पूर्वप्राथमिक व प्राथमिक शाळेचा रौप्य महोत्सव दिमाखदारपणे साजरे करण्यात आले. आणि अशा महोत्सवातूनच काही संकल्प सोडण्यात आले व पूर्णत्वास नेण्यात आले. यापैकी उच्च माध्यमिक कला व MCVC विभाग व स्वतंत्र इंग्रजी माध्यमाची शाळा.

वरील सर्व गोष्टी शक्य होत आहेत ते अर्थातच संस्थेच्या व शाळेतील उत्साही शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच !

परंपरा आणि आधुनिकता या गोष्टींचा वारसा जपणारी सुभेदारवाडा ही शाळा आजही लोकांना आकर्षित करते हेच शाळेचे वैशिष्ट्य !

श्री.प्रसाद सरदेसाई,
संचालक मंडळ सदस्य,ज.ए. इ. दादर