Ready Set Go


डॉ. उल्हास कोल्हटकर, अध्यक्ष ज. ए. इ. दादर

इतिहासाच्या दृष्टीने सव्वाशे वर्षांचा कालखंड हा छोटा असला तरी एखाद्या संस्थेच्या इतिहासात तो मोठा आणि महत्त्व अधोरेखित करणारा असतो. सन १८९० मध्ये स्थापन झालेल्या 'सुभेदार वाडा, कल्याण' शाळेच्या इतिहासाचे ज.ए.इ च्या इतिहासात असेच अनन्यसाधारण महत्त्व आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये आणि केवळ ज. ए. इ. ची च नव्हे तर ऐतिहासिक कल्याण शहराच्या शैक्षणिक व सांस्कृतिक जीवनाशीही या शाळेची नाळ घट्ट जोडली गेली आहे.केवळ ९६ विद्यार्थी सोबत घेऊन सुरू झालेली ही शाळा आजच्या घटकेला सुमारे ३५०० विद्यार्थ्यांकरीता आधारवड झालेली आहे हे कर्तृत्व तेथील शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे अन्य शालेय सहकाऱ्यांचे आणि कल्याणकरांचेही !

पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, मराठी, सेमी इंग्रजी, इंग्रजी अशी चहूबाजूंनी शाळा विस्तारत असताना

चित्रकला, छंद वर्ग, कराटे, एरोबिक, टेबलटेनिस, एन. सी. सी. अशा माध्यमातून विद्यार्थीही फुलवत नेऊन त्याला क्रमिक शिक्षणाबरोबरच खरे जीवनशिक्षण देऊन समर्थ बनवण्याची कला या शाळेने साध्य केली आहे याचा मुद्दामहून उल्लेख करावासा वाटतो.

उत्तम शाळा कोणती तर जी उत्तम माणसे घडविते! आणि या शाळेने घडविलेल्या उत्तम माणसांची यादी बघितली तर शाळेचे असामान्य कर्तृत्व आपोआपच अधोरेखित होते. उदा.:- माधवराव भिडे, कै. कृष्णराव धुळप, शांताराम घोलप, भाऊसाहेब साठे, माधवराव काणे, नानासाहेब फडके, दिलीप कोल्हटकर, वसंतराव काणे, अशोक दुगाडे, जिम्नॅस्ट प्रेम पाटील, वल्लरी धोंडे आणि .......यादी बरीच मोठी आहे.

शाळा कशी असावी तर एखाद्या वटवृक्षसारखी असे मला वाटते. या वृक्षाच्या छायेत माणसे आश्वस्त व विश्रांत होतात, ताजीतवानी होऊन पुढील प्रवासाला लागतात; त्यांच्या आधारे हजारो पक्षी आपला संसार फुलवितात; त्याचा भूपृष्ठावरील विस्तार जेवढा मोठा, आश्वासक तेवढाच भूपृष्ठाखालील मुळांचा विस्तार जोमदार, पोषक व विस्तृत; तो स्वतः तर विस्तारतोच पण पारंब्यांच्या माध्यमातून अधिकाधिक पसरतो. शाळा ही अशीच चहुबाजूंनी शाळेच्या व शाळाबाह्य परिसरात फुलली पाहिजे, आपल्या पारंब्यांच्या (विद्यार्थी व शिक्षक) माध्यमातून अधिकाधिक विस्तारली पाहिजे. 'सुभेदार वाडा, कल्याण' शाळेने नेमके हेच साधले आहे व म्हणून कल्याणकरांकरिता ती ज्ञानवटवृक्षा सारखी झाली आहे.

शाळेच्या पुढील प्रवासाकरिता ज. ए. इ. तर्फे हार्दिक शुभेच्छा .


डॉ. उल्हास कोल्हटकर,
अध्यक्ष ज. ए. इ. दादर