Ready Set Go


शाळेचे आदर स्थान - गुरुवर्य कै. श्री.सी.एम. पुराणिक

कै.श्री.चंद्रकांत मुरलीधर पुराणिक सरांचा जन्म १४ नोव्हेंबर १९३६ साली नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे झाला. सरांचे मूळ गाव महड , ता. बागलाण , जि.नाशिक हे असून या गावात सरांचे आजोबा सारे कुटुंब मुळात सर्व पुराणिक परिवाराचे वास्तव्य होते. अतिशय कष्टाने वेळप्रसंगी वार लावून तसेच त्यांच्या काकांनी स्थापन केलेल्या *'स्वोद्धारक विद्यार्थी वसतिगृहात'* राहून त्यांनी धुळे येथे एसएससी पर्यंत शिक्षण घेतले. धुळ्याच्या एस. एस. व्ही. पी. शाळेतून सर १९५४ साली एस.एस.सी परीक्षा पास झाले. एसएससी पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी त्यांनी नाशिक येथे एच.पी.टी. कॉलेज येथे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला.

दोन वर्षे इंटरसायन्स झाल्यावर त्यांनी नोकरीचा शोध सुरू केला यातच पुणे - कल्याण असा प्रवास करून ते मुरबाड इथे न्यू इंग्लिश स्कूल , मुरबाड येथे विज्ञान शिक्षक म्हणून काम करू लागले. त्यानंतर सरांनी नॅशनल कॉलेज, बांद्रा येथून बी.एस.सी. पूर्ण केले. १९६१ साली जून महिन्यात सर *सुभेदार वाडा हायस्कूल, कल्याण* येथे शिक्षक म्हणून रुजू झालेत. दोन वर्षे सलग नोकरी करून त्यांनी १९६३ मध्ये सोडली व परत १४ जून १९६५ पासून हायस्कूल कल्याण येथे सन्मानाने नोकरी करतच राहिले.त्यांनी १९७१ मध्ये बी.एड केले तेही सेवासदन कॉलेज, उल्हासनगर येथून. त्यात ते विद्यापीठात तिसरे आले.१९७९ साली 'व्होकेशनल गाईडन्स डिप्लोमा' ही पूर्ण केला.

शाळेत लागले त्या दिवसापासून शाळेच्या विकासासाठी सरांनी आज पर्यंत स्वतःला वाहून घेतले होते. फिजिक्स, केमिस्ट्री ,जनरल सायन्स, मॅथ्स, अंकगणित, बीजगणित ,भूमिती या सर्व विषयांवर सरांनी अध्यापन केले आहे. नवीन १० + २ + ३ हा शैक्षणिक आकृतीबंध १९७५ साठी आला. दहावी पहिली बॅच यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी सरांची 'Resource Person' म्हणून कामगिरी वाखाणण्यासारखी होती शाळांचे निकाल वाढावेत यासाठी जाणीवपूर्वक निकाल वृद्धीसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग सुरू केले . सुभेदार वाडा हायस्कूल कल्याण ने आतापर्यंत असंख्य वेळा शाळेच्या एस.एस.सी. च्या निकालाची सर्वाधिक गुणवत्तेची टक्केवारी जास्त असल्याची *नेने ढाल* मिळवली यात सरांचा वाटाही खूप मोठा आहे हे विसरून चालणार नाही. 'विज्ञान प्रदर्शन मार्गदर्शक', 'विशेष मार्गदर्शन वर्ग' इत्यादी उपक्रमाद्वारे शाळेच्या शैक्षणिक प्रगतीत व विकासात सरांनी आपले योगदान दिले आहे.

शाळा आणि ज.ए.इ.च्या विकासात सरांचा सहभाग महत्त्वाचा आहे. १९७४ मध्ये संस्थेच्या स्थायी समितीचे सदस्य १९७५ मध्ये शिक्षक प्रतिनिधी म्हणून तर १९७९ पर्यंत करंट फंड ट्रेझरर ही जबाबदारी सरांनी पूर्ण विश्वासाने पार पाडली. शाळेच्या विकासासाठी १९८४ साली सुभेदार वाडा शाळेत पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा सुरू करण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे तर १९९२ साली ज्युनियर कॉलेज तसेच एम.सी.व्ही.सी.आणि इंग्रजी व सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात देखील सरांची दूरदृष्टी आपल्याला पाहायला मिळते.

१९८९-९० शाळेच्या शताब्दी महोत्सवात कोषाध्यक्ष पदाची तर १९९२ ला संस्थेच्या शताब्दी निमित्त स्मरणिका समितीचे निमंत्रक म्हणून कार्य केले. २०१४ साली सुभेदारवाडा शाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव समितीचे प्रमुख सल्लागार म्हणून ही सरांनी काम पाहिले.१९९४ साली सुभेदारवाडा शाळेतून सर सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाले.तरीही संस्थेशी नाळ मात्र त्यांनी जोडून ठेवली आणि नंतर ही संस्थेचे कोषाध्यक्ष पद व माजी शिक्षक प्रतिनिधी म्हणूनही कार्यभार सांभाळला.

आज आपण आपल्या शाळेची चार मजली भव्य इमारत पाहतो तिच्या भूमीपुजनापासून ते संपूर्ण निर्मितीच्या प्रक्रियेत सरांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.

सरांचे कार्य फक्त ज.ए. इ संस्था आणि सुभेदारवाडा शाळा इतकेच मर्यादित नव्हते तर कल्याण शहरातील याज्ञवल्क्य या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेतही सर पदाधिकारी सभासद होते.सरांना पंचायत समिती कल्याण द्वारा *तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार* मिळाला . तसेच विश्वोद्धार संघटनेने *आदर्श शिक्षक* म्हणून त्यांना गौरविले आहे.

एकंदरीत पाहता सरांचा जीवनपट विद्यार्थी ,शिक्षण, शिक्षक , संस्था आणि समाज घटकांची पुरेपूर बांधिलकी ठेवणारा असा आहे . अशा या सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपणार्‍या आपल्या गुरुवर्य पुराणिक सरांनी १२ एप्रिल २०२१ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

सरांचे कार्य आम्हाला नेहमीच प्रेरणा देत असते. त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरूनच शाळेची वाटचाल पुढे सुरु आहे आणि यापुढेही राहील.

*गुरूने दिला ज्ञानरूपी वसा*

*आम्ही चालवू हा पुढे वारसा*

शाळेचे आदर स्थान
गुरुवर्य कै. श्री.सी.एम. पुराणिक