Ready Set Go


बहुजन समाजाच्या शिक्षणाचे जनक -- कै. श्री. गो. ना. अक्षीकर

कै. गो.ना.अक्षीकरांचा जन्म २५ सप्टेंबर १८६४ साली रायगड (तेव्हा कुलाबा) जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील 'अक्षी ' या गावी एका सुशिक्षित, सुसंस्कृत व सधन कुटुंबात झाला होता. आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखालील शासन यंत्रणेत त्यांचे पूर्वज कृष्णाजी नारायण तांबे आणि त्यांचे नातू सदाशिव गोविंद तांबे कार्यरत होते. पूर्वजांच्या अक्कलहुशारीने, प्रशासकीय कुशलतेमुळे त्यांना कुलाबा जिल्ह्यातील अनेक एकर जमीन रेवस, हाशिवरे, नागाव, अक्षी, चिखली या भागात इनाम म्हणून मिळाली. जमीन इनाम मिळाल्याने जमीनदार पाटील झाले.

अगदी लहानपणापासून ते शिक्षक व्हायचे स्वप्न पाहत होते. प्राथमिक शाळेत असताना सकाळ संध्याकाळ घरामागील नारळी-पोपळीच्या वाडीत लुटुपुटीची शाळा चालविण्याचा खेळ ते खेळत असत. वाडी हा त्यांचा वर्ग आणि झाडे-वेली हे त्यांचे विद्यार्थी. ' मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ते असे !

१८७१ साली प्राथमिक शाळा, अक्षी इथे अक्षिकरांचा पहिलीत प्रवेश झाला, तर १८७५ मध्ये इंग्रजी पहिली-जॉन एलफिन्स्टन हायस्कूल, अलिबाग इथे प्रवेश घेतला.१८८१ मध्ये मॅट्रिक परीक्षा अनुत्तीर्ण झाले म्हणून त्यांनी पुण्यास प्रयाण केले आणि पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत इंग्रजी७वी त पुन्हा प्रवेश घेतला. १८८२-८४ मध्ये मॅट्रिक व स्कूल फायनल परीक्षा ते उत्तीर्ण झाले.पुढे १८८४-८६ मध्ये मराठा हायस्कूल गिरगाव, मुंबई येथे माध्यमिक शिक्षक म्हणून नोकरी केली.

लोकमान्य टिळक, आगरकर आणि चिपळूणकर यांच्या पासून प्रेरणा घेऊन शिक्षण प्रसाराचे कार्य अक्षीकरांनी हाती घेतले. त्याकाळी मुंबईच्या उत्तर भागात म्हणजे महालक्ष्मी ते माहीम पर्यंत एकही शाळा नव्हती. दादर,वरळी, माहीम, वडाळा इ.भागात प्रामुख्याने कामगार, कुंभार, मजूर, सुतार,शेतमजूर यांची वस्ती असून शिक्षणाची गरज होती. म्हणून २ जून १८८९ मध्ये वयाच्या पंचविसाव्या वर्षी दादर येथे अक्षीकरांनी प्राथमिक व माध्यमिक शाळा (आत्ताची छबिलदास शाळा ) सूरु केली.

पुढे १८८९ ते १८९२ या काळात कल्याणला माध्यमिक शाळा ( आताची सुभेदारवाडा शाळा ) आणि ठाण्याला एक माध्यमिक शाळा ( आताची मो. ह.विद्यालय शाळा) स्थापन केली. या शाळांवर योग्य नियंत्रण व व्यवस्थापन असावे म्हणून २४ एप्रिल १८९२ रोजी जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट ची स्थापना केली.

अक्षीकर मास्तर हे अनासक्त कर्मयोगी होते.साधी राहणी, संभाषण कुशलता, दूरदृष्टी, सुंदर हस्ताक्षर, त्याग आणि शिक्षणाप्रति निष्ठा या गुणांमुळे ते सर्वाना प्रिय होते.आयुष्याभर त्यांनी शिक्षणा चे व्रत स्वीकारले होते.

प्रत्येक नवीन शाळा म्हणजे हजारो रुपयांचा खर्च. प्रसंगी पत्नी चे दागिने विकून, वडिलोपार्जित जमीन विकून त्यांनी खर्च भागवला. अज्ञान च्या अंधारात खितपत पडलेल्या जीवांचा उद्धार करण्याचा ध्यास अक्षीकरांनी घेतला होता. २७ - २८ वर्ष सततच्या धावपळीने मास्तर आजारी पडू लागले, त्यातच वयाच्या अवघ्या ५३व्या वर्षी त्यांना मृत्यू ने गाठले आणि एका पर्वाचा अस्त झाला.

कै. अक्षीकर मास्तरांनी लावलेल्या रोपट्याचा आज अनेकांसाठी आधारवड झाला आहे.'शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिक पणे कार्य करणारी संस्था' असा लौकिक संस्थेने प्राप्त केला आहे मागील १२७वर्षात संस्थेचा प्रचंड विस्तार झाला आहे. आज संस्थेच्या मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यात ९ पूर्व प्राथमिक, ९ प्राथमिक, ११माध्यमिक,७ उच्च माध्यमिक या मराठी माध्यमाच्या शाळा, 2 इंग्रजी माध्यमाच्या शाळा, 3 सी.बी.एस.सी. शाळा आणि एक महिला महाविद्यालय आहे. संस्थे मध्ये सुमारे १७००० विद्यार्थी शिक्षण घेत असून ४७५ शिक्षक आणि १५०शिक्षकेतर कर्मचारी संस्थेच्या सेवेत आहेत.

समाजातील सर्व सामान्य, कामगार, कष्टकरी लोकांची प्रगती केवळ शिक्षणातून च होईल या उदात्त हेतूने संस्था कार्यरत आहे. 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे .'हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.

संस्थेच्या विविध शाळांतून शिक्षण घेऊन समाजामध्ये मानाचे स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. संस्थेमध्ये शिकून विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्यांची माहिती द्यावयाची म्हणजे तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल..

अशा महान संस्थेची मी माजी विद्यार्थिनी आहे आणि याच संस्थेत सेवा करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजते.

आम्हा सर्वांचे प्रेरणा स्थान असलेल्या कै. गो.ना.अक्षीकरांच्या पवित्र स्मृती स विनम्र अभिवादन

सौ. रंजना पाटील
उपमुख्याध्यापिका
सुभेदारवाडा शाळा, कल्याण

संस्थेचे पदाधिकारी २०२४ ते २०२९
# नाव पदनाम
1 डॉ. श्री. उल्हास विश्वनाथ कोल्हटकर अध्यक्ष
2 श्रीमती साधना जयंत वैद्य उपाध्यक्ष
3 श्री.मिलिंद मार्तंड कुलकर्णी उपाध्यक्ष
4 श्री. देवराज लालचंद राका उपाध्यक्ष
5 श्री. शैलेंद्र राजाराम साळवी कार्याध्यक्ष
6 श्री.प्रदीप वालचंद राका उपकार्याध्यक्ष
7 श्री. रविंद्र कृष्णाजी तामरस कोषाध्यक्ष
8 श्री.विकास मुकुंदराव पाटील कार्यवाह
9 श्री.महेश निशिकांत केळकर उपकार्यवाह
संचालक मंडळ सदस्य
श्री.प्रदीप विश्राम गोसावी श्री. राजेंद्र जयसिंग राजपूत
श्री. इंद्रपाल बाबुराव चौगुले श्री. राधाकृष्णा दिनकर पाठक
श्री. अरविंद भालचंद्र पार्सेकर श्री. महेश महादेव म्हात्रे
श्री.श्याम तुकाराम सिंगासणे श्री. अनंत हेंदर भगत
श्री. संजय विश्वनाथ कानिटकर श्री. सुनील भास्कर पाटील
श्री. सुरेश रामचंद्र जाधव श्री.अशोक सुदाम साळी
सौ स्नेहा गणेश शेडगे सौ. आरती सुजित राऊत
सौ. वैशाली विकास पाटील श्री. विजय रघुनाथ भिडे (सनदी लेखापाल)